नवी दिल्ली : कलम ३७० रद्द करणे, तीन तलाक बंदी यासह अनेक धडाकेबाज निर्णय घेत केंद्र सरकारने अवघ्या शंभर दिवसांत ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे.
तसेच सामान्य नागरिकांना प्रत्येक स्तरावर बळकटी देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली, अशा शब्दांत केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सरकारचा लेखाजोखा रविवारी जनतेपुढे मांडला आहे.

मोदी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रकाश जावडेकर म्हणाले की, समान कार्यासाठी समान वेतन, शेतकरी, मजूर आणि व्यापाऱ्यांना पेन्शन, बँकांचे विलीनीकरण, पायाभूत विकास, पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय सरकारने घेतला.
तसेच जलसंवर्धनासाठी विशेष मंत्रालय स्थापन करण्यात आले. वरील सर्व कामांतून ऐतिहासिक जनादेशाचा सन्मान करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी कठोर परिश्रम आणि धाडसी निर्णय घेत १०० दिवस गाजविल्याचे जावडेकरांनी अधोरेखित केले.
वैध कारवाया प्रतिबंधक अधिनियम बनविणे आणि अर्थव्यवस्था पाच अब्ज डॉलर्सची बनविण्याची मोर्चेबांधणी सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वीच केली होती. कारण निवडणुकीत जनता भाजपलाच निवडून देणार आहे, याची खात्री आम्हाला होती, असेही जावडेकर यांनी ठासून सांगितले.
दुसरीकडे, आर्थिक विकास मंदावणे हा वैश्विक मंदीचा परिणाम आहे. ही परिस्थिती दीर्घकाळ असणार नाही, असा दावा करीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या आरोपांचे जावडेकरांनी जोरदार खंडन केले आहे