यंदा दोनदा दिवाळी साजरी होणार

Ahmednagarlive24
Published:

चंदीगड : यंदा एक दिव्यांची आणि दुसरी कमळाची अशी दोनदा दिवाळी साजरी होणार असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय होणार असल्याचा दावा केला. यावेळी त्यांनी कलम ३७० आणि राफेलच्या मुद्यावरून काँग्रेसवरही सडकून टीका केली.

मोदींनी हरयाणातील चरखी दादरी येथील भाजप उमेदवार कुस्तीपटू बबिता फोगाट हिच्यासाठी मंगळवारी प्रचार सभा घेतली. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी ‘दंगल’ पाहिल्याचे मोदींनी सांगितले. यावेळी मोदींनी दंगल चित्रपटातील ‘म्हारी छोरीयां छोरोंसे कम हैं के’, असा डायलॉग मारत लेक वाचवा लेक शिकवा मोहिमेत हरयाणाने उल्लेखनीय प्रगती केल्याचे नमूद केले.

यंदाची दिवाळी लेकींच्या नावाने साजरी करूया, असे आवाहन करताना मोदी म्हणाले की, यंदा एक दिव्यांची आणि दुसरी कमळाची अशी दोनदा दिवाळी साजरी होणार आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात कलम ३७० आणि राफेलचा मुद्दाही उपस्थित केला.

जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या उज्ज्वल भविष्यासाठी कलम ३७० हटवून या काश्मीरचे विभाजन करण्यात आले. संपूर्ण देशाने या निर्णयाचे स्वागत केले. काही विरोधी पक्षांनीही समर्थन दिले; परंतु काँग्रेसने नेहमीप्रमाणे या निर्णयालादेखील विरोध केला.

एवढेच नाही, तर काँग्रेस नेते या मुद्यांवर अफवा पसरवून जगात भारताची प्रतिमा मलिन करत आहेत, असा आरोप मोदींनी केला. राफेल लढाऊ विमानांच्या समावेशामुळे भारतीय वायू दलाचे सामर्थ्य वाढणार आहे. मात्र, काँग्रेसने राफेलच्या पूजेवरून टीका केली.

देशाच्या भल्यासाठी असलेल्या निर्णयांवरही काँग्रेस पक्ष नकारात्मक राजकारण करतो, असे मोदी म्हणाले. हरयाणातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी गेल्या ७० वर्षांपासून पाकिस्तानात वाहून जात आहे.

हे पाणी रोखण्यासाठी आपल्या सरकारने पावले टाकली असून, तुमच्या हक्काचे पाणी तुम्हाला मिळेल, असे सांगत मोदींनी शेतकऱ्यांनाही चुचकारण्याचा प्रयत्न केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment