मतदार आता खोटे आश्वासन देणाऱ्या युती सरकारला घरी बसवतील !

Ahmednagarlive24
Published:

कर्जत : राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही; परंतु ठराविक उद्योजकांसाठी मोठ-मोठ्या सवलती दिल्या जातात, याला नेमकं काय म्हणायचं? भाजप सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांची मोठी उपेक्षा केली असून, त्याची किंमत आता त्यांना मोजावी लागणार आहे.

मतदार आता खोटे आश्वासन देणाऱ्या युती सरकारला घरी बसवतील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. महाआघाडीच्या कर्जत येथील सभेत बोलताना पवार यांनी भाजप-सेना युती सरकारच्या कारभारावर चांगलेच तोंडसुख घेतले.

सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. पाऊस असूनही सभेला चांगली गर्दी होती. ते पुढे म्हणाले की, खोटं बोला परंतु रेटून बोला, यातच भाजप-सेना युतीचे नेते पटाईत आहेत. पाच वर्षांत युती सरकारकडून कुठल्याच प्रकारची प्रभावी कामे झाली नाहीत, कुठलीच आश्वासने सरकारने पाळली नाहीत.

भाजप-सेना युती सरकारने पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलाच निर्णय घेतला नाही. ना कर्जमाफी, ना पीकविमा, ना कुठल्याच शेतीमालाला हमीभाव. युती सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, त्या युती सरकारला मते मागण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment