शिक्षकांची शासनाकडून वारंवार फसवणूक शिक्षक दिनावर घालणार बहिष्कार

Published on -

नगर- शिक्षक दिन हा शिक्षकांसाठी गौरवाचा दिवस असतो. मात्र शिक्षकाला गुरू मानणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात मागील पाच वर्षात शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नाकडे शासन  वारंवार दुर्लक्ष करित असून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नाही, त्यामुळे शिक्षकांची वारंवार  फ़सवणुक होत असून या  मागण्यांचा तत्काळ शासन आदेश न काढल्यास येत्या शिक्षक काळ्या फिती लावून दिनावर बहिष्कार घालणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे सदस्य प्रा. सतीश शिर्के यांनी दिली. 

     मुख्यमंत्रीसाहेबांनी महाजनादेश यात्रा काढण्याऐवजी आदेश देऊन  विनाआनुदानित शाळांना आता १००% अनुदान, २००५ पूर्वी सर्व नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन, प्रस्तावित पदांना आर्थिक तरतुदी सह मान्यता द्यावी.

        शिक्षकांच्या विविध संघटनांनी आतापर्यंत शेकडो आंदोलने केली, निवेदने दिली, शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केल्या. मात्र आश्वासनांची पूर्तता न झाल्याने शिक्षकांमधे फ़सवणुकीची भावना निर्माण झाली आहे. यामधे विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न गंभीर असून मजूरापेक्षा व भिकाऱ्यांपेक्षा दयनीय अवस्था झाली आहे. १५-२० वर्षापासून वेतन नसल्याने अनेक शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कधी तरी शाळेला अनुदान मिळेल, ‘अच्छे दिन’ येतील या आशेवर काम करणारे शिक्षक विद्यादानाचे काम करतात. मात्र शासनाला त्यांच्या त्यागाची जाणीव नाही.  

       मुला-मुलींना मोफत पाठ्यपुस्तकें देऊन आणि दुपारचे भोजन दिल्याने शिक्षणाचा दर्जा सुधारत नाही. त्याहून जीव ओतून काम करण्यासाठी समाधानी शिक्षकांची आवश्यकता असते.   शासनाने याबाबत तत्काळ आदेश निर्गमित करावा अन्यथा सर्व शिक्षक संघटना मिळून शिक्षक काळ्या फिती लावून शिक्षक दिनावर बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!