कांद्याची सहा हजारांकडे झेप

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : राज्यभरात भीषण दुष्काळ व त्यापाठोपाठ सांगली, सातारा,नाशिकमध्ये आलेला महापूर या नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याचे उत्पादनच झाले नाही. त्यामुळे कांद्याची आवक कमालीची घटली आहे. त्यामुळे कांद्याचे दर चांगलेच वाढले आहेत.

शनिवारी अहमदनगर येथील नेप्ती उपबाजार समितीत झालेल्या लिलावात एक नंबरच्या कांद्याला ५ हजार ६०० रूपये एवढा विक्रमी दर मिळाला.

सततच्या भीषण दुष्काळामुळे मेटाकटीला आलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसाने परत झोडपल्याने शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दैयनिय झाली आहे. दुष्काळाने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागल्याने शेतातून कवडीचेही उत्पादन मिळाले नाही.

त्यानंतर पावसाने काही भागात जोरदार हजेरी लावली तर काही भागात परत हुलकावणी दिली. त्यामुळे अनेक ठिकाणी खरिपाची पिके देखील वाया गेली. त्यामुळे आधिक दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या संकटात भरच पडली.पावसाने ताण दिल्याने अनेक भागातील लाल कांद्याचे उत्पादन झाले नाही.

तर काही भागात जोरदार पावसाने सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक या भागातील अनेक मोठमोठी प्रकल्प भरल्याने या भागातील नद्यांना महापूर आला होता. परिणामी या पुराने या परिसरातील जनजीवनच उद्ध्वस्त केले.

आता मागील काही दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यभरात सुरू असलेल्या परतीच्या संततधार पावसाने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहीले आहे. त्यामुळे शेतातील कांद्याचे पीक पूर्णपणे सडले आहे.पर्यायाने आता बाजारात अत्यंत अल्प प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. त्यामुळे कांद्याचे चांगलेच वाढलेले आहेत.

देशभर कांद्याचे भाव वाढतच आहेत कारण व्यापारी त्यांच्याकडे असलेल्या साठ्यातून कांदा विकत आहेत. नवीन पिकाची प्रतीक्षा आहे पण कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये झालेल्या पावसाने तेथील पिकास त्याचा फटका बसला आहे. विविध प्रदेशानुसार देशभरात किंमती वाढल्या आहेत आणि आगामी काळात त्या आणखी वाढू शकतात. असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. .

मुख्यत: या पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे कर्नाटकमधील कांदे खराब झाले आहेत आणि त्यामुळे देशभरात पुरवठा कमी झाला आहे.

कांद्याच्या कमतीत वाढ झाल्याने जरी शेतकऱ्यांना कमी अधिक फायदा होत असला तरी देखील संततधार पावसाने शेतकऱ्यांचे सोयाबिन, बाजरी,तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment