‘अगस्ती’ च्या सभासदांची दिवाळी गोड – मधुकर पिचड

Ahmednagarlive24
Published:

अकोले : अगस्तीच्या कार्यक्षेत्रात ऊस कमी आहे. तथापि, सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडता कामा नये, म्हणून कारखाना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. कार्यक्षेत्रातील ऊस व बाहेरून तितकाच ऊस उपलब्ध करून पाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार अगस्तीने केला आहे.

साखरेबरोबरच आर्थिक मदत करून सर्वांची दिवाळी गोड केली जाईल, असे आश्वासन अगस्तीचे अध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिले. रौप्य महोत्सवी वर्षातील सर्वसाधारण सभेत सर्व विषय मंजूर केल्यानंतर पिचड बोलत होते.

ते पुढे म्हणाले, अगस्ती स्वयंपूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येतील. आढळा व निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील ज्या गावांना पाण्याचा दुहेरी फायदा होईल, तेथील जमिनीचे क्षेत्र आढळा धरणातून कमी करण्याची मागणी करण्यात येईल. धामोडीफाट्यावर पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.

अगस्तीच्या शिल्लक चार लाख टन साखरेचा रिटेल विक्रीसाठी विचार केला, तर शेतकऱ्यांना चांगला ऊसदर व कामगारांची शिल्लक देणी देण्यासाठी मदत होईल. उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी अगस्तीच्या आर्थिक परिस्थितीची माहिती दिली.

रौप्य महोत्सवी वर्षात कार्यक्षेत्रातील ३ लाख २२ हजार व बाहेरून २ लाख ५४ हजार टन ऊस आणून ५ लाख ७६ हजार टन गाळप केले. ६ लाख ७७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. सभासदांबरोबरच गेटकेनला एफआरपीपेक्षा अधिक २४०० रूपये दर दिला. साखर उतारा ११.७६ असून प्रतिदिन सरासरी ३५०० टन गाळप झाले, असे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment