कडकनाथ कोंबडी पालनात शेतकऱ्यांची फसवणूक

Published on -

राहाता : तुम्ही फक्त कोंबडी वाढवा आणि परत द्या. बाजारातील इतर कोंबड्यांपेक्षा आम्ही तिला २०० ते २५० रुपये जास्त भाव देऊ, असे आमिष दाखवून कडकनाथ कोंबडी मार्केटिंगची साखळी चालविणाऱ्या एका कंपनीने राहाता व कोपरगाव तालुक्यातील सुमारे १५ शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.

कडकनाथ कोंबडी चांगली असल्याचा मोठा गाजावाजा करीत एका कोंबडी मार्केटिंग कंपनीने शेतकऱ्यांना गुंतवणूक करायला लावली. साखळी पद्धतीने ही योजना राबविण्यात आली. या कोंबड्यांची मागणी जास्त आणि उपलब्धता कमी असल्याचे चित्र निर्माण करून गुंतवणुकीसाठी शेतकऱ्यांना परावृत्त करण्यात आले.

एका युनिटला ३०० कोंबड्यांसाठी ६० हजार रुपये अनामत रक्कम कंपनीला द्यायची. त्यानंतर कंपनी एक दिवसाचे पिल्लू, खाद्य, औषधे पुरविणार. ८५ दिवसानंतर कंपनी कोंबडी ताब्यात घेणार, असा करार शेतकऱ्यांशी करण्यात आला.

ज्याचे एक युनिट असेल तर ३० हजार, दोन युनिट असतील तर ६० हजार, असे वर्षांत चार वेळेस एका युनिटला १ लाख २० हजार रुपये मिळणार होते. तसेच घेतलेली अनामत रक्कमही परत केली जाणार होती, असे आश्वासन कंपनीने दिले.

कंपनीच्या अमिषाला बळी पडून कोंबड्याच्या युनिटसाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून शेड उभारले. ठरल्याप्रमाणे कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी ८५ दिवसांनंतर कोंबड्या घेऊन गेले; पण पैसे मिळायला तयार नाही.

असे असताना दुसरा लॉट घेण्यासाठी कंपनीचे लोक आले. आधी नेलेल्या कोंबड्यांचे पैसे द्या, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. परंतु, कंपनी पैसे देईना. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe