अहमदनगर – जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक दिनांक २३ व २४ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौर्यावर येत आहेत.

नाशिक विभागात श्री. दीना नाथ आणि डॉ. सुभाष चंद्रा यांचे दोन सदस्यीय पथक येत असून ते काही ठिकाणी भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन तसेच प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेणार आहेत.
या दौर्यात ते राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर आणि संगमनेर तालुक्यातील काही गावांना भेटी देणार आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने राज्याच्या विविध भागात अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विविध सदस्यांचे पथक राज्याच्या दौर्यावर पाठवले आहे.
त्यातील श्री. नाथ आणि डॉ. चंद्रा हे जिल्हा दौर्यावर येत आहेत. जळगाव येथील पाहणी आटोपून हे पथक दि. २३ रोजी कोपरगाव तालुक्यातील गावांना भेटी देऊन शिर्डी मुक्कामी येणार आहे.
तसेच दुसर्या दिवशी राहाता, श्रीरामपूर आणि संगमनेर तालुक्यातील गावांना भेटी देऊन हे पथक मुंबईकडे रवाना होणार आहे.













