अहमदनगर – जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यापासून परतीच्या पाऊसाने प्रचंड हानी झाली असून, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेश चिटणीस अंबादास गारुडकर, उपाध्यक्ष किसनराव लोटके, पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, दिपक पवार, सरचिटणीस सोमनाथ धूत, महिला प्रदेश उपाध्यक्षा शारदाताई लगड, विलास सोबळे, आरिफ पटेल, किसन बेदमुथा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. खरीपाची सर्व पिके असलेली बाजरी, सोयाबीन, तूर, मका, कापूस, भाजीपाला, कांदा, केळी, भुईमुग, द्राक्ष, डाळींब, टोमॅटो, फळपिके यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
तर परतीच्या पावसामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, ढगाळ वातावरणाच्या प्रादुर्भावाने भाजीपाला व फळभाजी क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप व रब्बी हंगामातील सुमारे 3 लाख 64 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बाधित क्षेत्रापैकी बुधवारपर्यंत जवळपास 1 लाख 69 हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झालेले आहेत. जिल्ह्यात 1519 गावामध्ये 4,85,489 शेतकर्यांचे नुकसान झालेले असून, जिह्यातील शेतकर्यांचे झालेले नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाने दि.7 नोव्हेंबर पर्यंत मुदत दिलेली होती.
परंतु अद्यापही जिल्ह्यात जवळपास 44 ते 45 टक्के टक्के पंचनामे झालेले आहेत. सदरील पंचनामे करण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा कमी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. पंचनामे करत असताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. शेतकर्यांना विमा भरलेल्या पावती सदरील अधिकारी मागत आहेत.
तसेच काही ठिकाणी जीपीएसव्दारे फोटो काढताना नेटवर्कच्या अडचणी येत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. जिल्ह्यात नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकर्याना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अजूनही अवेळी पाऊस कोसळत असल्याने जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकर्याच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, पिडीत शेतकर्यांना तातडीने प्रती हेक्टर 50 हजार रुपये देण्यात यावे,
फळबागा व भाजीपाल्यासाठी नुकसान भरपाई म्हणून प्रती हेक्टर 1 लाख रुपये मदत देण्यात यावे, शेतकर्याचे पीक कर्ज व वीज बील पुर्णपणे माफ करण्यात यावे, रब्बीच्या पेरणीसाठी शेतकर्यांना बी बियाणे, खते मोफत देण्यात यावीत, तसेच पशुधन व घरांची झालेली पडझड पाहता त्यांचे पंचनामे तत्काळ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेतकर्यांच्या पिकाच्या व मालाच्या झालेल्या नुकसानाबाबत त्याना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करून मदत द्यावी, अन्यथा अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.