वॉशिंग्टन : पाण्याबिगर आपण जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. मात्र एखाद्याला चक्क पाण्याचीच ॲलर्जी आहे, असे कधी तुम्ही ऐकलेय का? आंघोळ तर दूरची गोष्ट साधे पाणी पिणेही असह्य वेदना देते. एवढेच नाही तर घाम व डोळ्यांतून अश्रू निघाले तरी शरीरावर चट्टे पडतात आणि ताप व डोकेदुखी सुरू होते.
अमेरिकेतील टेसा हॅनसन स्मिथ नावाची २१ वर्षीय तरुणी या दुर्मिळ आजाराची शिकार ठरली आहे. ज्यावेळी ती रडते वा तिच्या शरीरात घाम निघतो, तेव्हा तिच्या त्वचेवर वेदनादायक पुरळ उठते वा चट्टे पडतात.
टेसा एक्वाजेनिक अर्टिकॅरिआ आजाराने ग्रस्त आहे. जगभरात शंभर लोक या आजाराने प्रभावित आहेत. या विचित्र आजारामुळे टेसा ज्यावेळी पाण्याच्या संपर्कात येते तेव्हा अर्धशिसी होते व त्यानंतर काही मिनिटांतच तिचे शरीर तापाने फणफणते.
या ॲलर्जीमुळे ती खेळूही शकत नाही आणि महिन्यातून फक्त दोनदाच आंघोळ करते. पाण्याचा एक घोट पिणेही तिच्यासाठी मोठे वेदनादायक ठरते. कॅलिफोर्नियात राहणारी टेसा सांगते की, तिला स्नायूंमध्ये सतत प्रचंड थकवा आल्यासारखे वाटते व उलटी झाल्यासारखे वाटते.
एवढेच नाही तर जास्त रसाळ फळे व भाजीपाला खाल्ल्यानंतरही तिला या समस्येला सामोरे जावे लागते. पाणी पिल्यानेही तिच्या जिभेवर चरे पडतात.