पारनेर: न्यायालयाचा विना जामीन वॉरंट बजाण्यासाठी गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ, तसेच मारहाण केल्याप्रकरणी पारनेर येथील एकाच कुटुंबातील ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये ३ महिलांचाही समावेश आहे.
पारनेर पोलिस ठाण्याचे रामचंद्र पांडुरंग वैद्य व अण्णा चव्हाण हे दोघे पोलिस दीपक मार्तंड पठारे यांच्या विरोधात न्यायालयाने काढलेला विना जामीन वॉरंट बजाण्यासाठी त्यांच्या घरी गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारस गेले होते.
वॉरंट बजावून पठारे यांनी पोलिस ठाण्यात यावे, अशी सूचना पोलिसांनी पोलिसांना केल्यानंतर दीपक मार्तंड पठारे, वसंत मार्तंड पठारे, गणेश वसंत पठारे, सनी रामदास पठारे, शुभांगी दीपक पठारे, जयश्री रामदास पठारे, कल्पना वसंत पठारे व रामदास मार्तंड पठारे यांनी एकत्र येत सरकारी कामात अडथळा निर्माण करून फिर्यादी रामचंद्र वैद्य यांच्या कपाळावर तसेच पायास मारहाण केली.
दगड विटांनी मारहाण करून ढकलून देण्यात आले. त्यांच्यासोबत असलेले अण्णा चव्हाण यांना शिवीगाळ करून त्यांनाही मारहाण करण्यात आली.