दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी प्रादेशिक समग्र आर्थिक कराराच्या (आरसीईपी) मुद्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधताना ‘मेक इन इंडिया’चे ‘बाय फ्रॉम चायना’त रूपांतर झाल्याची कडवट टीका केली.
‘प्रादेशिक समग्र आर्थिक करारामुळे भारतात स्वस्त वस्तूंचा महापूर येईल. यामुळे भारतातील लक्षावधी नोकऱ्यांवर गंडांतर येऊन अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होईल’, असे राहुल गांधी यांनी सोमवारी ‘आरसीईपी’शी संबंधित एका बातमीचा दाखला देत केला.
‘मेक इन इंडियाचे आता बाय फ्रॉम चायनात रूपांतर झाले आहे. सरकार आपल्या जनतेसाठी दरवर्षी प्रत्येकी ६ हजार रुपयांच्या वस्तूंची आयात करते. २०१४ नंतर आयातीत तब्बल १०० टक्क्यांची वाढ झाली आहे.
आरसीईपीमुळे भारतात स्वस्त सामानाचा महापूर येईल. यामुळे लाखो नोकऱ्यांवर गंडांतर येऊन अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होईल’, असे राहुल सोमवारी एका ट्विटमध्ये म्हणाले.