‘माझ्या मुलाला फाशी द्या, किंवा त्याने त्या मुलीला जाळले तसे त्यालाही जाळून टाका’ !

Ahmednagarlive24
Published:

हैदराबाद : पशुवैद्यक महिला डॉक्टरची सामूहिक बलात्कारानंतर जाळून निघृर्ण हत्या करणाऱ्या ४ पैकी एका आरोपीच्या आईने आपल्या मुलालाही जिवंत जाळून टाकण्याची मागणी केली आहे. 

‘त्याला फाशी द्या,  किंवा त्याने त्या मुलीला जाळले तसे त्यालाही जाळून टाका,’ असे त्यांनी म्हटले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पीडित कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देत या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्याची घोषणा केली आहे.

येथील एका २६ वर्षीय वेटरनरी महिला डॉक्टरची बुधवारी रात्री सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळला. पोलिसांनी या प्रकरणी मोहम्मद आरिफ, जोल्लू शिवा, जोल्लू नवीन व चिंताकुंटा चेन्नाकेशावुलू या ४ आरोपींना अटक केली आहे.

या सर्वांनी आपला गुन्हा मान्य केला असून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना फासावर चढवण्याची मागणी केली आहे. यापैकी चेन्नाकेशावुलूच्या आईने तर थेट आपल्या मुलालाही मृत मुलीसारखेच जिवंत जाळून टाकण्याची मागणी केली आहे. ‘त्याला फाशी द्या किंवा त्याने त्या महिला डॉक्टरला जाळले तसे त्यालाही जाळून टाका,’ असे चेन्नाकेशावुलूची आई श्यामला यांनी रविवारी म्हटले आहे.

 ‘मलाही एक मुलगी आहे. मी त्या कुटुंबाचे दु:ख समजू शकते. मी माझ्या मुलाचा बचाव केल्यास आयुष्यभर लोक माझा द्वेष करतील,’ असे त्या म्हणाल्या. ‘पोलिसांनी गुरुवारी सकाळी माझ्या मुलाला चौकशीसाठी नेले, तेव्हा आम्हाला धक्काच बसला. त्याचे ५ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. आम्ही त्याच्या पसंतीच्या मुलीशी त्याचे लग्न लावून दिले. त्याला मूत्रपिंडाचा आजार आहे. त्यामुळे केव्हाही त्याच्यावर दबाव टाकला नाही,’ असे त्या म्हणाल्या.

न्यायालयाने या चारही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे, पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात कुचराई करणाऱ्या ३ पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या सर्व आरोपींवर ‘एफआयआर’ दाखल करण्यात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्हा बार असोसिएशनने आरोपींतर्फे कुणाचाही युक्तिवाद न करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आरोपींचे भयंकर कृत्य पाहता आम्ही नैतिक व सामाजिक जबाबदारींचे भान ठेवून हा निर्णय घेतला आहे,’ असे संघटनेचे अध्यक्ष मट्टापल्ली श्रीनिवास यांनी म्हटले आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment