मुंबई : केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून लघु उद्योजकांसाठी ‘मुद्रा कर्ज योजना’ आणली. देशभरातील अनेकांनी या योजनेचा लाभ घेत मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले, परंतु आता कर्जाची परतफेड होत नसल्याने यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने चिंता व्यक्त केली आहे.
भारतीय लघु उद्योग विकास बँके (सिडबी)च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सूक्ष्म वित्तवरील कार्यक्रमात भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युप्टी गव्हर्नर एम. के. जैन यांनी बँकांना मुद्रा कर्ज योजनेंतर्गत देण्यात आलेल्या कर्ज पुरवठ्यावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. ते यावेळी म्हणाले की, मुद्रा योजनेवर आमची नजर आहे. या योजनेमुळे देशातील अनेक छोट्या उद्योजकांना दिलासा मिळाला.

शेकडो-हजारो लाभार्थींना अर्थ पुरवठा करण्यात आल्याने त्यांचे जीवनमान सुधारले आहे, परंतु त्याचवेळी अनेकांनी कर्जाची परतफेड न केल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे बँकांनी यापुढे कर्ज देताना कागदपत्रांची तसेच उद्योजकांची चाचपणी करणे आवश्यक असल्याचे मतही जैन यांनी व्यक्त केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली मुद्रा कर्ज योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत सूक्ष्म व लघु उद्योजकांसाठी वित्त पुरवठा उपलब्ध करून दिला.