कर्जत :कुकडी कालव्यासाठी संपादित केलेल्या ज़मिनीचा योग्य मोबला न मिळाल्याने कोरेगाव येथील मूकबधिर शेतकरी हणुमंत मारुती जाधव यांचा मुलगा अशोक हणुमंत जाधव यांनी सोमवार, दि.१८ रोजी कर्जत येथील उपविभागीय कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबतची महिती अशी की, तालुक्यातील कोरेगाव येथील मूकबधिर शेतकरी हणुमंत मारुती जाधव यांची गटनंबर १५०३ मध्ये शेती असून, यातील १५०३/२ एवढे क्षेत्र कुकडी कालव्यासाठी संपादित झालेले आहे.
हे संपादित झालेले क्षेत्र बारमाही बागायती क्षेत्र होते. भूसंपादनावेळी भूसंपादन समितीनेेखील ही जमीन बागायत असल्याचे निर्देशित केले होते.
त्यामुळे या भूसंपादन क्षेत्राचा मोबदला बागाईत क्षेत्राप्रमाणे मिळण्याची आवश्यकता आहे. मात्र, उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून फेर प्रस्तावामध्ये सदरील क्षेत्र जिराईत असल्याचे नमूद केले असून, हा प्रस्ताव कुकडी कालव्याच्या कोळवडी कार्यालयात दाखल केला असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
अन्यायग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा अशोक जाधव यांनी अनेक वेळा उपविभागीय कार्यालयाकडे विनंती अर्ज केले. परंतू त्याची दखल घेण्यात आली नाही. दि. ४ सप्टेंबर २०१९ रोजी हणुमंत जाधव यांचे बंधू ज्ञानदेव मारुती जाधव यांनी झालेल्या प्रकाराच्या माहितीसाठी माहिती अधिकारांतर्गत अर्ज़ केला.
मात्र, ही माहिती देण्यास उपविभागीय कार्यालयाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला आहे. यामुळे अशोक हणुमंत जाधव यांनी सोमवार, दि. १८ रोजी कर्जत उपविभागीय कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.