चिक्कमंगळुरू :- कर्नाटकातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कतील यांनी हे वृत्त फेटाळले आहे.
रविवारी त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्यात आणि मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. कतील यांनी पत्रकारांना सांगितले की, माझ्यात आणि येडियुरप्पा यांच्यातील संबंध खूप चांगले आहेत. विरोधी पक्ष आमच्यात गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत.
येडियुरप्पा राज्य सरकारचे नेतृत्व करत आहेत तर मी पक्षाचे. राम मंदिराच्या निर्माणाला राष्ट्र मंदिराच्या निर्माणाच्या रूपात पाहूया असेही ते म्हणाले. सर्व समाज घटकांना त्याच्या निर्माणासाठी पुढे यायला हवे. सर्वोच्च न्यायालयाने हाच संदेश दिला आहे.
कतील यांनी भाजप नेते राजू यांनी काँग्रेस नेते तथा माजी मंत्री डी. के. शिवकुमार यांनी घेतलेल्या भेटीबाबत बोलताना सांगितले की, ते चांगले मित्र असल्याने राजू यांनी शिवकुमार यांची भेट घेतली. जर एखादा भाजप नेता विरोधी पक्षाच्या नेत्याची भेट घेत असेल तर याचा अर्थ असा नाही की तो पक्ष सोडत आहे.
मी देखील काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री बी. जनार्दन पुजारी यांची भेट घेतली होती. याचा अर्थ हा नाही की, मी देखील काँग्रेसमध्ये सहभागी होत आहे किंवा पुजारी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतील.
कतील यांनी सांगितले की, पक्ष ५ डिसेंबरला १५ विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या तयारीला लागला आहे. पोटनिवडणुकीच्या आधीच भाजपत मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चेने पक्षाच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे बोलले जात आहे.