आशुतोष काळे आणि बिपीन कोल्हे यांच्या समर्थकांत धुमश्चक्री

Ahmednagarlive24
Published:

कोपरगाव :- नगरपालिकेच्या साठवण तलाव क्रमांक ५ चे काम समृद्धी महामार्गाचे ठेकेदार गायत्री कन्स्ट्रक्शनला देण्यासंदर्भात बोलवलेल्या बैठकीत आशुतोष काळे व बिपीन कोल्हे यांच्या समर्थकांत सोमवारी चांगली धुमश्चक्री झाली.

प्रथम कोल्हे यांच्या उपस्थितीवरून व बैठक संपल्यानंतर टंचाई आढावा बैठक महत्त्वाची असल्याने प्रांत व तहसीलदारांनी तेथे उपस्थित रहावे म्हणून बिपीन कोल्हे यांनी सांगताच या बैठकीत निश्चित निर्णय झालेला नाही, आम्हाला अधिकाऱ्यांशी बोलायचे आहे, असे काळे म्हणताच कोल्हे व त्यांचे समर्थक चिडले.

अरे-तुरेची भाषा सुरू झाली. कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पंधरा मिनिटे हा गोंधळ चालू होता. नंतर काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधत आमचे धरणे आंदोलन सुरूच राहील, असा खुलासा केला. साठवण तलाव क्र. ५ चे काम सुरू व्हावे, अशी अनेक दिवसांची मागणी आहे.

नगराध्यक्ष विजय वहाडणे व संजय काळे यांच्या मते गायत्री कन्स्ट्रक्शन तलावाची खोदाई करून गाळ काढण्यास तयार होती. कोल्हे समर्थक मात्र गायत्री हे काम करण्यास अनुत्सुक असल्याचे सांगत होते.

आशुतोष काळे समर्थकांनी कुठल्याही परिस्थितीत साठवण तलाव ४ व ५ चे काम झालेच पाहिजे, यासाठी सोमवारपासून धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रशासनाने याची दखल घेत तहसील कार्यालयात बैठक बोलावली.

आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, कोसाकाचे अध्यक्ष आशुतोष काळे, नगराध्यक्ष वहाडणे, तहसीलदार योगेेेेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, राजेंद्र सोनवणे, गायत्री कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट मॅनेजर ताताराव डुंंगा व इतर काही पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.

बैठक ठरावीक निमंत्रितांसाठी होती, बिपीन कोल्हे यांना निमंत्रण नसताना ते कसे आले, अशी तक्रार काळेंंनी अधिकाऱ्यांकडे करून बैठकीतून निघून जाण्याची सूचना केली. परंतु तरीही बैठक सुरू झाली. काळे यांनी आमचे समाधान झालेले नाही, असे सांगत अधिकाऱ्यांशी चर्चा करायची आहे, असे सांगितले.

परंतु बिपीन कोल्हे यांनी दरडावून आता बैठक संपली, तुम्ही चला असे म्हणताच काळे चिडले. तुम्ही जा, आम्ही बोलतो असे म्हणत उभयतांमध्ये वाद सुरू झाला. दोघे एकमेकांवर धावून गेले. शब्दाने शब्द वाढत गेला. शेवटी काळे व कोल्हे समर्थकांत धुमश्चक्री झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment