अहमदनगर : अयोध्या निकाल, ईद आणि गुरुनानक जयंतीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने नगर प्रांताधिकारी तथा नगर उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी तब्बल २८८ जणांना हद्दपार केले आहे.
याचबरोबर ५७ जणांना अटी, शर्ती लादून शहरात वास्तव्याची मुभा दिली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ (२) अन्वये श्रीनिवास यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करीत हे आदेश जारी केले आहेत.
कायदा आणि सुवव्यस्था राखण्याच्या हेतूने प्राप्त अधिकाराचा वापर करीत हद्दपारीची व अटी शर्तींची प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. याबाबतचे आदेश जारी केले असून, या आदेशाचे उल्लंघन केल्यास भादवि १८८ नुसार कठोर कारवाई केली जाईल, असा रोखठोक इशारा उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिला आहे.
अयोध्या येथील रामजन्मभूमी संबंधातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष लागले होते. काल शनिवार रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने याबाबत आपला निकाल जाहीर केला. राम जन्मभूमी निकालाच्या सोबतच ईद व गुरुनानक जयंती हे उत्सव देखील सलग आले आहेत.
जनमानसातील महत्त्वाच्या केंद्रबिंदू असणाऱ्या या तिन्ही घटना सलगपणे एकाच अवधीत येत असल्याने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प आणि एमआयडीसी पोलीस ठाणे यांनी नगर उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे ३४५ व्यक्तींच्या संदर्भात प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव सादर केले होते.
या प्रस्तावावर साधकबाधक विचार करीत नगर उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी चार पोलीस ठाणे मिळून २८८ जणांना आगामी चार दिवसांच्या कालावधीसाठी हद्दपार केले आहे.
तर कोतवाली हद्दीतील सत्तावन्न जणांवर अटी शर्ती लादून त्यांना शहरात वास्तव्याची मुभा दिली आहे. काल रविवार दि. ९ रोजीपासून मंगळवार दि. १२ रोजी पर्यंतच्या चार दिवसांच्या कालावधीसाठी उपविभागीय दंडाधिकारी यांचे हे आदेश बंधनकारक राहणार आहे.
पोलीस ठाणेनिहाय कारवाई
कोतवाली : २०५,
तोफखाना : १०४,
भिंगार कॅम्प : २९,
एमआयडीसी : ०७