नेवासा : कर्जबाजारीपणाला कंटाळून बाळासाहेब भाऊसाहेब गोंडे (वय ३७, रा. भेंडा खुर्द, ता. नेवासा) या तरुण शेतकऱ्याने काल रविवारी (दि. २४) रात्री घराजवळच्या पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील भेंडा-गोंडेगाव रस्त्यावरील गोंडे वस्तीवर राहणारे तरुण शेतकरी बाळासाहेब भाऊसाहेब गोंडे याने रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
नऊ वाजेच्या सुमारास घराकडून तो विहिरीकडे पळतच गेला. पळत जाऊन त्याने विहिरीत उडी घेतली. त्यावेळी त्याच्या मागे त्याचा भाऊही पळत गेला. परंतु, त्याला काही कळण्याच्या आतच बाळासाहेब पाण्याने भरलेल्या ५० फूट खोलीच्या विहिरीत उडी घेतली.
त्याला स्वत:लाही आणि भावालाही पोहता येत नव्हते, त्यामुळे तो पाण्यात बुडला. भावाने आरडाओरड करून इतरांना एकत्र केले.
मात्र, रात्रीचा अंधार आणि पाण्याने भरलेली विहीर यामुळे बाळासाहेबला वाचविण्यासाठी वेळेत मदत न मिळाल्याने त्याचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. कर्जबाजरीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती आहे.
मयत बाळासाहेब याच्या मागे आई, वडील, भाऊ, मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. नेवासाचे तहसीलदार व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून, रात्री उशिरा साडेदहानंतरही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू होते.