पारनेर – अयोध्येतील राममंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय संवैधानिक व लोकतांत्रिक दृष्टीने ऐतिहासिक असल्याचे सांगतानाच या निर्णयानंतर आता आजपर्यंत अनेक वर्षे मंदिर, मशिदीवरून जे लोक राजकारण करत होते, ते आता होणार नाही, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला.
राममंदिरावरून अनेक वर्षे वाद विवाद चालले होते. त्यावर आता पडदा पडला आहे. न्यायव्यवस्था सर्वोच्च व्यवस्था आहे. त्यापेक्षा मोठे कोणी नाही, असे सांगून हजारे पुढे म्हणाले, देशाला स्वातंत्र मिळून ७३ वर्षे उलटली आहेत.
आमच्या देशात जात, पात, धर्म, वंशांचे अनेक लोक राहतात. देशात रंग, रूप, वंश, भाषा अनेक आहेत, पण आपण सर्व एक आहोत. देशाची ही परंपरा न्यायव्यवस्थेमुळे आहे. स्वातंत्र्यानंतर आपला देश सुरळीत चालला आहे. त्याला कारण आपली न्यायव्यवस्था आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार केली.
त्या न्यायव्यवस्थेच्या आधारे हा देश गुण्यागोविंदाने नांदतो आहे. त्याच न्यायव्यवस्थेने आज जो निर्णय दिला, तो आम्ही सर्वांनी मान्य केला पाहिजे. देशातील सर्व लोकांनी या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. रामजन्मभूमीवरून आजपर्यंंत सुरू असलेले देशातील राजकारण या निर्णयामुळे थांबेल का, असे विचारले असता अण्णा म्हणाले, या निर्णयामुळे खूप फरक पडेल. लोक आजपर्यंत अनेक वर्षे मंदिर मशिदीवर राजकारण करत होते. ते आता होणार नाही.
राममंदिराबरोबरच मशिदीसाठीही पाच एकर जागा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आता ही दोन्ही स्थळे प्रार्थनेपुरती मर्यादित न ठेवता या स्थळांमधून आम्हाला माणसे घडवायची आहेत. जो माणूस शेजाऱ्याचा विचार करतो, समाजाचा, देशाचा विचार करतो अशी माणसे घडवायची आहेत.
पवित्र मंदिरे एवढ्यासाठीच असतात. लोकांच्या जीवनात विचार कसे रूजतील हा प्रयत्न करणे गरजेचे आहे. बरीच वर्षे एक दुसऱ्याची मने दुखावली गेली आहेत. आता मात्र निकाल चांगला आला असून गुण्यागोविंदाने नांदण्यासाठी रस्ता मोकळा झाला आहे.