राहुरी: मेंढ्या धुण्यासाठी मुळा धरणाच्या बॅकवॉटर मध्ये गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रशांत उत्तम खांडेकर असे या मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की तालुक्यातील जांभळी येथील १५ वर्षे वयाचा प्रशांत उत्तम खांडेकर हा मेंढ्या धुण्यासाठी मुळा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेला होता. त्याच्याबरोबर अनिल खेळणार, अंकुश बाचकर हे देखील होते.
मुळा धरणाच्या पलीकडे असणाऱ्या जांभळी भागात गावात पालखी येणार म्हणून पाण्यात मेंढ्या धुण्यासाठी प्रशांत व त्याचे साथीदार सकाळी साडेदहाच्या सुमारास गेले होते. मेंढ्या धुताना प्रशांत पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला.
त्याचे सहकारी अंकुश बाचकर,अनिल खेमनर,अप्पा बाचकर यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. यावेळी जांभळीचे सरपंच रामदास बाचकर , उपसरपंच पाटीलबा बाचकर, दादा बाचकर, रामनाथ पवार तसेच परिसरातील लोक धावुन आले.
तासाभराच्या प्रयत्नानंतर दुपारी बाराच्या सुमारास प्रशांतचा मृतदेह आढळून आला. वावरथ-जांभळी भागात पालखी सोहळ्यासाठी मेंढ्या धुण्यासाठी ही मुले गेली होती. मृत प्रशांत हा ढवळपुरी येथे इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.