विकासकामांसाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यावे

Ahmednagarlive24
Published:

शेवगाव : निवडणुकीपुरते राजकारण, निवडणूक झाल्यानंतर मात्र विकासकामांसाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यावे, असे माझे धोरण असून, निधी देतानाही मी कधी कोण कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचार केला नाही, शहरात सरसकट सर्व नगरसेवकांना निधी दिला.

यापुढील काळातही सार्वजनिक कामांना प्राधान्याने निधी दिला जाईल, विकासाच्या मुद्यावर आपण आगामी निवडणुकीला सामोरे जाणार असून, विकास कामांसाठी यापुढील काळातही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.

शेवगाव नगर परिषद अंतर्गत ९ कोटी ६१ लाख रुपये खर्चाची विविध विकास कामे, शहरटाकळी येथे २० लाख रुपये खर्चाचा मुरकुटे वस्ती-पवार वस्ती रस्ता डांबरीकरण, सुलतानपूर (मठाचीवाडी) येथे ४० लाख रुपये खर्चाच्या पेट्रोल पंप ते सामृत वस्ती रस्ता डांबरीकरण,

१ कोटी ४६ लाख रुपये खर्चाच्या सुलतानपूर – कुकाणा रस्ता दुरुस्ती ,रांजणी येथे २० लाख रुपये खर्चाच्या शिदोरे वस्ती ते सरकारी विहीर रस्ता डांबरीकरण, अशा तालुक्यातील ११ कोटी ८७ लाख खर्चाच्या विविध कामांचा शुभारंभ आज गणेशचतुर्थीच्या मुहुर्तावर आ. राजळे यांच्या हस्ते झाला , त्यावेळी शेवगाव येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी बापूसाहेब भोसले होते. आ. राजळे म्हणाल्या, शेवगाव शहर हे आपले आहे ही ही भावना मनात असल्याने शहराच्या विकासासाठी मी भरीव निधी दिला आहे, निधी खर्च झाला नाही तर नागरिकांत रोष निर्माण होतो म्हणून अधिकारी व कर्मचायांनी तातडीने हा निधी खर्च होण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

शहरासाठी स्वतंत्रपणे ६८ कोटी रुपये खर्चाची पाणीयोजना अंतिम टप्प्यात आहे. बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा सर्व्हे सुरू असून, शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे कामही लवकरच मार्गी लागेल. निवडणुकीमुळे काहीजण याबाबतीत गैरसमज पसरवून संभ्रम निर्माण करीत आहेत. मात्र, त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment