श्रीगोंदा तालुक्यातील बनावट नोटांप्रकरणी सलीम चांद सय्यद व अण्णा ज्ञानदेव खोमणे (दोघेही रा. घारगाव, ता. श्रीगोंदा) या दोघांना मंगळवारी अटक करण्यात आली.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. बनावट नोटा तयार करून त्या वितरित करणाऱ्या टोळीचा श्रीगोंदा पोलिसांनी पर्दाफाश केला.
बनावट नोटाप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यात पकडण्यात आलेल्या आरोपींकडून दररोज नवनवीन माहिती उघडकीस येत आहे. बनावट नोटा हव्या असणाऱ्या व्यक्तीला शोधून त्याला बनावट नोटा तयार करून देण्यात येत होत्या.
पाचशे व दोन हजार रुपये किंमतीच्या नोटा आरोपी तयार करीत होते. वीस हजार रुपयांच्या बदल्यात एक लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा देण्यात येत होत्या. गेल्या चार महिन्यांपासून आरोपी अशाप्रकारच्या बनावट तयार करून देत असल्याचे तपासात समोर आले आहे.
पुणे येथील बारामती येथील श्रीकांत माने, त्याचा नातेवाइक युवराज कांबळे व श्रीगोंद्यातील शिवाजी जरे हे तिघे बनावट नोटा तयार करीत होते. हे तिघेच बनावट नोटा तयार करणाऱ्या गुन्ह्यातील मास्टर माइंड असल्याचे पोलिस सांगत आहेत.
गेल्या चार महिन्यांपासून हे तिघे संगणकाच्या सह्याने बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणत होते. श्रीगोंद्यातील मांडवगण येथे एका शेतामध्ये बनावट नोटा तयार करण्यात आल्या होत्या. परंतु येथील ठिकाणाची माहिती पोलिसांना कोणीतरी देईल, या भितीने दौंड तालुक्यातील खडकी येथील एका नातेवाइकाच्या घरी या नोटा तयार करण्यात येत होत्या.
बनावट नोटा घेणाऱ्या व्यक्तीला शोधले जात होते. त्यानंतर व्यवहार ठरला जात होता. एक लाखांच्या बनावट नोटांच्या बदल्यात २० ते ३० हजार रुपयांच्या खऱ्या नोटा घेतल्या जात होत्या. आतापर्यंत दहा लाख रुपयांच्या नोटा या तिघांनी बनवून त्या दुसऱ्यांना दिल्या होत्या.