श्रीगोंदे – ठाणे जिल्ह्यात नोकरीला असलेल्या पोलिस निरीक्षकाच्या पत्नीच्या नावे श्रीगोंदे तालुक्यातील कोथूळ येथे जमीन होती. काही लोकांनी बनावट आधार कार्ड बनवून ही शेतजमीन परस्पर विकली.
या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वेल्हा (पुणे) येथील किशोर चंद्रकांत पासलकर हे ठाणे जिल्ह्यात पोलिस निरीक्षक असून त्यांच्या पत्नी मीना पासलकर यांच्या नावे कोथूळ येथे (गट नं ३२६/५/२ क्षेत्र १ हेक्टर ४५ आर) धोंडिराम काळू पवार यांच्याकडून २००५ मध्ये जमीन खरेदी करण्यात आली होती.
५ जुलै २०१८ रोजी बनावट आधार कार्ड तयार करून व बनावट महिला उभी करून राजाराम गोपीनाथ भोसले (कोथूळ) व गोरख तुकाराम लगड (कोळगाव) यांनी श्रीगोंदे दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट खरेदी केली.
याबाबत मीना किशोर पासलकर यांनी राजाराम भोसले, गोरख लगड व इतरांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव करत आहेत.
पोलिस निरीक्षक पासलकर यांनी पत्नीच्या नावे २००५ मध्ये घेतलेल्या साडेतीन एकर जमिनीची १३ वर्षांनी परस्पर विक्री झाली, याचा थांगपत्ता त्यांना कसा लागला नाही, या बाबत चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षकाला गंडा घातल्याचाप्रकार समोर आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये हा एक चर्चेचा मुद्दा बनलेला आहे.