श्रीगोंदा : पोलिसांनी सध्या वाळूतस्करांकडे आपला मोर्चा वळवला असून, गत दोन दिवसात पोलिसांनी चोरटी वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर,चार ट्रक, एक डंपर जवळपास १७ ब्रास वाळू असा एकूण ६३ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांच्या फिर्यादीवरून चोरटी वाळू वाहतूक केल्याप्रकरणी सात जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, दि.१२रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे वांगदरी शिवारातील मदनेवाडी येथील घोडनदीपात्रात छापा टाकून, बेकायदेशीर विनापरवाना वाळू वाहतूक करणारे एक डंपर व तीन ट्रक त्यातील वाळूसह असा एकूण ४५ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पो.कॉ अमोल आजबे यांच्या फिर्यादीवरून सुनील भारत काकडे (रा.दैठणे ता.परंडा, जि.उस्मानाबाद), प्रवीण दगडू शेडे (रा.शिरूर), गणेश रावसाहेब साबळे (रा.तरडोबाचीवाडी,ता.शिरूर),ट्रक नंबर एमएच १२ एलटी ५१२२ अज्ञात चालक-मालक यांच्याविरोधात श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दि.११रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा हिरडगाव रस्त्यावरील आंबील ओढा, येथे चोरटी वाळू वाहतूक करणारा एक ट्रक तीन ब्रास वाळू असा एकूण ५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, गुन्हे शाखेचे पो.कॉ.मधुकर मिसाळ यांच्या फिर्यादीवरून दैवत मोहन जाधव (रा.मखरेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दि.११रोजी साडेसात वाजता पोलिसांनी पेडगाव येथील इदगाह मैदान रस्त्यावर चोरटी वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर व दोन ब्रास वाळू असा एकूण १३ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.