श्रीरामपूर :- अशोक साखर कारखान्याच्या गैरकारभाराची चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करावे, संबंधित पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे यांनी नगर येथील साखर संचालकांकडे केली.
२३ महिन्यांपासून कारखान्यातील गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी साखर संचालकाकडे करत आहोत. या अनुषंगाने विशेष लेखापरीक्षक अजित मुठे यांनी मागणी करूनही कारखान्याने तपासणीसाठी दप्तर उपलब्ध केले नाही. तसा अहवाल मुठे यांनी वरिष्ठांना दिला.
सन २०१७-१८ च्या गळीत हंगामात ऊसतोड वाहतूक खर्चात मनमानी पद्धतीने बदल केला. कारेगाव भाग शुगर केन ट्रान्स्पोर्ट कंपनी ही कारखान्याशी संलग्न नसून खासगी आहे. या कंपनीवर मर्जीतील संचालकांची नियुक्ती केली. सन २०१३ ते १६ या तीन गळीत हंगामांत तीन कोटी ३४ लाख ९२ हजारांच्या रकमेचा फरक अहवालातील तोडणी वाहतूक खर्चात बदल केला.
प्रोसिडिंगमध्ये खाडाखोड करणे असे आक्षेप वैधानिक लेखापरीक्षकांनी नोंदवले असताना साखर संचालकांनी कारवाई केली नसल्याचे औताडे यांनी म्हटले. शेतकरी संघटनेचे अनिल औताडे यांची मागणी कोणताही गैरव्यवहार नाही विशेष लेखापरीक्षक राजेंद्र देशमुख यांनी कारखान्यास भेट देऊन कागदपत्रांची तपासणी केली.
कारखान्याकडून त्यांना आवश्यक ती माहितीही देण्यात आली. सन २०१३ ते १६ या गळीत हंगामाच्या सालाचे छपाई दोष आढळले आहेत. कारखान्यात कुठलाही गैरकारभार झालेला नाही, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी दिली.