श्रीरामपूरसह जिल्ह्यातील नगरपालिकांना रस्त्यांसाठी विशेष निधी द्यावा- स्नेहल खोरे

Ahmednagarlive24
Published:

श्रीरामपूर – अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, देवळाली-प्रवरा, कोपरगाव, संगमनेर, राहता, राहुरी, श्रीगोंदा, जामखेड, शेवगाव, पाथर्डी नगरपालिका हद्दीतील मुख्य रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ रस्त्यांसाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.स्नेहल केतन खोरे यांनी केली आहे. 

याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिलेल्या मागणी पत्रात सौ.स्नेहल खोरे यांनी म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील सर्व नगरपालिका हद्दीतील मुख्य रस्ते निधी अभावी रखडले आहेत. त्यातच यंदा झालेल्या अति पावसामुळे रस्त्यांची दैना अवस्था झाली आहे.

मुख्य रस्त्यांना मोठे मोठे खड्डे पडले असल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच छोटे मोठे अपघात वाढले आहे. नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. खड्डे बुजवण्यासाठी माती, मुरूम, बांधकाम मटेरियलचा वापर सर्रास होत असल्याने शहरभर धुळीचे साम्राज्य तयार होत आहे.

रस्त्यांचे खड्डे व धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य पूर्णतः धोक्यात आले आहे. तरी रस्त्यांची कामे करणेकामी अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तसेच राज्यस्तर नगरोथान, विशेष रस्ता अनुदान अंतर्गत नगरविकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांचेकडून तात्काळ भरीव निधी मिळणे गरजेचे आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे प्रशासकीयददृष्ट्या आपण पालक असल्याने आपण जलदगतीने सर्व नगरपरिषद प्रशासनांकडून प्रस्ताव मागवून घेतल्यास श्रीरामपूर शहरवसायियांसह जिल्ह्यातील नागरिकांच्या हालअपेष्टा दूर होतील असा विश्वास असल्याचे खोरे यांनी म्हटले आहे.

जिल्हा नियोजन समिती सदस्या स्नेहल खोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या मागणी पत्रात श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रँच कॅनॉल पूल ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत संगमनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अंडर ग्राउंड पुलापर्यंत नेवासा रोड, मेनरोड कॅनॉल पूल ते वेशीपर्यंत बेलापूर रोड, सय्यद बाबा चौक ते गोंधवणी कॅनॉल पुलापर्यंत रस्ता, नॉर्दन ब्रँच ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत शिर्डी-शिंगणापूर रस्ता,

सिद्धिविनायक मंदिर ते सरस्वती कॉलनी कॅनॉल रस्ता, गोंधवणी कॅनॉल पूल ते संजयनगर फातेमा हाऊसिंग सोसायटी रस्ता, गायत्री सौ मिल ते थत्ते मैदान ते विजय हॉटेल रस्ता, मुळा प्रवरा ते म्हसोबा चौक ते पूर्णवाद नगर रस्ता, साईबाबा मंदिर शेजारील अंडर ग्राऊंड पूल वॉर्ड नं.२ ते संजय नगर पाणी टाकीपर्यंत रस्ता या रस्त्यांसाठी निधी मिळावा म्हणून मागणी केली आहे.

तर मेनरोड व गोंधवणी रस्त्यांचे टेंडर विधानसभा आचार संहिता सुरू होण्याच्या आधीच नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर केलेले असल्याने या रस्त्यांसाठी निधी मिळावा म्हणून मागणी केली नसल्याचे खोरे यांनी स्पष्ट केले.     

खराब रस्त्यांमुळे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. नागरिकांच्या हालअपेष्टा दूर करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्या स्नेहल खोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करत नगरपालिकांच्या प्रशासनाकडून तात्काळ प्रस्ताव मागवून घेण्याची विनंती केल्याने नगरविकास विभाग, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हाधिकारी पातळीवर रस्त्यांसाठी अतिरिक्त निधी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment