कोपरगाव संगमनेर येथील गिरीश अशोक अभंग याने कोपरगाव येथे तलाठी असलेल्या पत्नीच्या बंगल्यावर १३ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृताची पत्नी सोनाली भीमराव विधाते (माहेरचे नाव) हिच्यासह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
पत्नीच्या अनैतिक संबंधातून गिरीशने आत्महत्या केल्याची फिर्याद महेंद्र अशोक अभंग यांनी दिली. गिरीशचे सोनालीबरोबर ९ मार्च २०१४ ला चासनळी येथे लग्न झाले होते. कोपरगाव येथे ते एकत्र रहात. गिरीशचे येवलानाका येथे क्लासिक झेरॉक्स व ऑनलाइन सेंटर आहे. त्यांना आत्मेश नावाचा मुलगा झाला. सोनाली तलाठी म्हणून कार्यरत असून तिचे एका वाहनचालकाशी अनैतिक संबंध आहेत, हे लक्षात आल्यानंतर पती-पत्नीत वाद सुरू झाले.
सासरकडील लोकांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल तो भाऊ महेंद्र व कुटुंबीयांना सांगत असे. गिरीश व सोनाली यांनी घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला. कोर्टाने अर्ज मंजूर केला, परंतु गिरीशची शैक्षणिक व इतर महत्त्वाची कागदपत्रे सोनालीच्या ताब्यात होती. घटस्फोटाच्या अंतिम तारखेला तिने कोर्टात कागदपत्रे आणली नाहीत. कोजागिरी पौर्णिमेला मला सुटी आहे.
फ्लॅटवर येऊन कागदपत्रे घेऊन जा, असे तिने सांगितले. गिरीश १३ ला सकाळी कागदपत्रे आणण्यासाठी कोपरगावला गेला. रात्री पोलिसांचा फोन आला की, गिरीश आजारी आहे. कुटुंबीय कोपरगावला आले असता सोनालीच्या घरी गिरीशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लक्षात आले.
गिरीशच्या मृत्यूस पत्नी सोनाली भीमराव विधाते, भीमराव महादू विधाते, संदीप नाना चौरे, दीपाली संदीप चौरे, विकास गाडीलकर हे जबाबदार असून त्यांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून व बदनामीला कंटाळून गिरीशने आत्महत्या केल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर सोनालीसह ५ जणांवर गुन्हा दाखल झाला.