जिंद : भाजपच्या हरयाणातील एका उमेदवाराने रविवारी ‘विधानसभा निवडणुकीत कुणालाही मत दिले तरी ते भाजपलाच मिळणार’ असल्याचा वादग्रस्त दावा केल्यामुळे देशात एकच खळबळ माजली आहे.
यासंबंधीचा एक व्हिडिओ हरयाणात चांगलाच व्हायरल झाला आहे. भाजपचे असंध विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बख्शीशसिंह विर्क यांनी हा दावा केला आहे. ‘तुम्ही कोणतेही बटन दाबले तरी मत कमळाच्या फुलालाच मिळेल.
आज तुम्ही चूक केली तर त्याचे फळ तुम्हाला ५ वर्षे भोगावे लागेल. तुम्ही मत कुणाला दिले, हे आम्हाला कळेल. आम्ही ते तुम्हालाही सांगू. मोदी व मनोहरलाल खट्टर यांची नजर खूप तीक्ष्ण आहे. तुम्ही मत कुठेही टाकले तरी निघणार तर फूलच आहे.
आम्ही यासाठी ईव्हीएममध्ये योग्य ते बदल केले आहेत,’ असे विर्क यांनी मतदारांशी संवाद साधताना म्हटले आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विर्क यांनी एका निवेदनाद्वारे या व्हिडिओशी छेडछाड करण्यात आल्याचा दावा केला आहे.
दुसरीकडे, जननायक जनता पार्टीचे (जजपा) नेते दुष्यंत चौटाला व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांनी विर्क यांचे हे विधान अत्यंत लज्जास्पद असल्याचा आरोप केला आहे. ‘काँग्रेसने यापूर्वीच ईव्हीएमच्या प्रामाणिकतेवर संशय व्यक्त केला आहे.