चंदीगड : हरयाणा विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजपला प्रतिद्वंद्वी काँग्रेस व जननायक जनता पक्षाने (जेजेपी) तगडे आव्हान दिले असतानाही भाजपने विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
तर हरयाणाची सत्ता पादाक्रांत करीत जोरदार पुनरागमन करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. राज्यात एकूण ८९ लाख तरुण मतदार आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्याच हाती सत्तेची चावी असल्याचे मानले जात आहे.
हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी आज सोमवारी मतदान पार पडणार आहे. १९,५७८ केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मतदानासाठी ७५ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने प्रचारासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, सनी देओल, गौतम गंभीर तर काँग्रेसकडून राहुल गांधी, अशोक गहलोत यांनी प्रचार केला. हरयाणात एकूण ११६९ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात ७५ जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे.
दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जेजेपी व इनेलोदनेसुद्धा कामगिरी उंचावण्यावर विशेष भर दिला आहे; परंतु हरयाणा निवडणुकीवर एक दृष्टिक्षेप टाकला असता राज्यात भाजप व काँग्रेस तसेच जेजेपीमध्ये मुख्य लढत होत असल्याचे चित्र आहे. कलम ३७० रद्द करणे व राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करणाऱ्या भाजपने यंदा पुन्हा सत्ता हस्तगत करू, असा विश्वास व्यक्त केला आहे. विरोधक बिथरले आहेत.
त्यामुळे भाजपपुढे कोणताही तुल्यबळ शत्रू नाही, असे सांगत मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी विजयाचा दावा केला आहे. दुसरीकडे, काँग्रेसनेही जोरदार पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली आहे.
दरम्यान, राज्यात एकूण ८९ लाख तरुण मतदार आहेत. ते ज्या पक्षाला कौल देतील त्यांच्या हाती सत्ता येण्याची शक्यता आहे. म्हणून खऱ्या अर्थाने राज्यात युवा वर्गाची भूमिका निर्णायक ठरणार आहे, असे बोलले जात आहे..