न्यूयॉर्क : प्रेमातून नेहमी सगळे काही चांगलेच घडते असे नाही. कधीकधी मनुष्याचा मूळ स्वभाव त्यास विध्वंसक रूपसुद्धा देऊ शकतो. याचे ताजे उदाहरण अमेरिकेतील नेब्रास्का प्रांताची राजधानी लिंकनमध्ये पाहण्यास मिळाले.
खरे म्हणजे तिथे १९ वर्षांच्या एका तरुणीने आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराच्या आठवणी कायम स्मरणातून काढून टाकण्यासाठी त्याच्या संबंधित असलेली प्रत्येक वस्तू नष्ट करण्याचा निर्णय घेतला. . मोठ्या भेटवस्तूंना तर तिने कचऱ्याची कुंडी दाखवली.

मात्र त्याआधी प्रेमपत्रांना आग लावण्याला प्राध्यान्य दिले. पूर्वाश्रमीच्या प्रियकराची पत्रे जाळून टाकण्यासाठी तिने बुटेन टॉर्चचा वापर केला. जमिनीवर जळणारी पत्रे तशीच टाकून ती दुसऱ्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेली. हळूहळू आगीने जमिनीला टाकलेल्या गालिच्याला आपल्या विळख्यात घेतले. त्यानंतर काय मग, एकदम संपूर्ण घरच आगीने भडकले.
अर्थात अग्निशमन दलाने दाखविलेली तत्परता आणि समजदारीने त्या तरुणीला घरातून सहीसलामत बाहेर काढण्यात आले. आगीमुळे घराचे फारसे नुकसान झाले नाही. मात्र काही हजारांच्या वस्तू जळून खाक झाल्या.