या प्रशासनाचे करायचे काय? खाली डाेके वर पाय…

Published on -

नगर : माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ शिवसेना सोमवारी रस्त्यावर उतरली. पोलिस प्रशासनाचा धिक्कार असो, या प्रशासनाचे करायचे काय? खाली डाेके वर पाय अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी कोतवाली पोलिस ठाण्यासमोर निदर्शने केली.

खोटा गुन्हा तत्काळ मागे घेऊन या प्रकरणाची चौकशी करावी, तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्याशिवाय कारवाई करणार नाही, असे आश्वासन अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. फुलसौंदर यांच्यासह त्यांच्या दहा नातेवाईकांविरूध्द मारहाण व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

जागेच्या वादातून हा प्रकार घडला असून एका आदिवासी महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. भगवान फुलसौंदर, गणेश फुलसौंदर, महेश फुलसौंदर, अरुण फुलसौंदर व पाच अनोळखी व्यक्तींसह दहा जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पीडित आदिवासी महिला १२ ऑगस्टला दुपारी साडेचारच्या सुमारास बुरूडगाव रस्त्यावरील पडीक रानात बकऱ्या चारताना हा प्रकार घडला. जागेचा वाद मिटवायचा की नाही, असे म्हणत आरोपींनी मारहाण केली. नंतर गणेश व महेश फुलसौंदर यांनी बलात्कार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!