शिवपुरी : पंचायतीसमोर उघड्यावर शौच केल्यामुळे दोघांनी दोन लहान मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यप्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात घडली. दोन व्यक्तींनी १२ वर्षीय रोशनी वाल्मिक व १० वर्षीय अविनाश वाल्मिकला शौचास बसण्यावरून बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे दोन्ही लेकरांचा जीव गेला.
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या लेकरांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. लेकरांच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या दोन्ही भावांना पोलिसांनी अटक केली आहे.
यादवबहुल गावांमध्ये पूर्वीपासून आपल्याला जातीय मानसिकतेचा सामना करावा लागत असल्याची व्यथा पीडित लेकरांचे वडील मनोज वाल्मिक यांनी मांडली. गावातील सर्व लोकांनी पाणी भरल्यानंतरच आम्हाला हापशाने पाणी घेऊ दिले जाते. दोन वर्षांपूर्वी आरोपींसोबत माझे भांडण झाले होते. त्यांनी आपल्याला जातीय शिवीगाळ करत मारण्याची धमकीही दिली होती, असा आरोप मनोज यांनी केला आहे.
याशिवाय कमी पैशांमध्ये मजुरी करण्यासाठी आपल्यावर सातत्याने दबाव टाकला जात होता, असे ते म्हणाले. लेकरांचा जीव घेणाऱ्या दोन्ही भावांवर हत्या आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
अशी माहिती पोलीस निरीक्षक आर. एस. धाकड यांनी दिली आहे. या घटनेनंतर गावामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.