गांधीजींचे विचार आजही प्रासंगिक, पंतप्रधान मोदी, यूएन प्रमुखांचे प्रतिपादन

न्यूयॉर्क/ नवी दिल्ली : हवामान बदल, दहशतवाद आणि भ्रष्टाचार यासारख्या समस्यांचा सामना करत असलेल्या आजच्या जगातदेखील राष्ट्रपिता महात्मा गांधींचे सिद्धांत मार्गदर्शक आहेत. त्यांचे विचार आजही कालसुसंगत आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी व संयुक्त राष्ट्र अर्थात यूएने प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी गांधींचे महत्त्व अधोरेखित केले.

 यावेळी यूएन मुख्यालयातील गांधी सौर पार्क आणि गांधी शांतता उद्यानाचे जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. .

यूएनच्या मुख्यालयात गांधीजींच्या १५०व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी ‘नेतृत्व महत्त्वाचे : समकालीन जगात गांधींची प्रासंगिकता’ या विषयावर विशेष कार्यक्रम ठेवण्यात आला होता. भारताकडून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मोदींशिवाय यूएनचे महासचिव अँटोनियो गुटेरेस, दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जेई इन, सिंगापूरचे पंतप्रधान ली सीन लुंग, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, जमैकाचे पंतप्रधान अँड्र्यू होलनेस व न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. 

या सर्वांच्या उपस्थितीत यूएन मुख्यालयातील ५० किलोवॅट क्षमतेचे गांधी सौर पार्क व गांधी शांतता उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर संयुक्तराष्ट्राकडून एक विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले. भारताने जवळपास १० लाख डॉलरचे सौर पॅनल भेट म्हणून दिले आहेत. हे पॅनल यूएन मुख्यालयाच्या छतावर लावण्यात आले आहेत. 

कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मोदींनी गांधींच्या विचारांची आजही गरज असल्याचे प्रतिपादन केले. तर गांधींचे विचार व त्यांचे कार्य संयुक्त राष्ट्राच्या कार्यातील प्रमुख स्तंभ आहेत. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन आपल्याला सर्व स्तरातील लोकांना सोबत घेऊन कार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन गुटेरेस यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment