देशावर ८८ लाख कोटींचे कर्ज असूनही सर्वकाही चांगले कसे?

Ahmednagarlive24
Published:

नवी दिल्ली : भारताच्या डोक्यावर तब्बल ८८ लाख कोटी रुपयांचे डोंगराएवढे कर्ज आहे. तरीही सर्वकाही चांगले कसे आहे? असा परिस्थितिसापेक्ष सवाल काँग्रेसने शनिवारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील भारतीयांना संबोधित करताना, भारतात सर्वकाही अलबेल असल्याचा दावा केला होता.

त्यावर आर्थिक आकडेवारीचा हवाला देत काँग्रेसने तोंडसूख घेतले आहे. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सरकारवर टीकेचा भडिमार केला. त्या म्हणाल्या की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचे कर्ज ८८ लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे.

मागील तिमाहीच्या तुलनेत हे कर्ज ४ टक्क्यांनी वाढले आहे. निश्चितपणे हा चिंतेचा विषय आहे; परंतु अशा विदारक स्थितीत सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी सरकार कॉर्पोरेट विश्वाला सवलत देत आहे, असा आरोप श्रीनेत यांनी केला

देशात सर्वकाही अलबेल आहे, असा दावा नरेंद्र मोदी परदेशातून करीत आहेत; परंतु भारताच्या डोक्यावरील कर्जाचा भार पाहता देशात सर्वकाही चांगले आहे, असे कसे म्हणता येईल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एकेकाळी फ्रान्सच्या महाराणीने भाकरीऐवजी केक खा, असा अजब सल्ला दिला होता.

सद्यस्थिती पाहता भारताची वाटचालसुद्धा महाराणीच्या वृत्तीप्रमाणेच होत असल्याचा टोला श्रीनेत यांनी लगावला आहे. दरम्यान, केंद्र सरकारला कदाचित वस्तुस्थिती ज्ञात नाही. सामान्य जनतेच्या खिशात दमडी नाही. अशात कॉर्पोरेट कर कपात केला जात आहे.

यातून कार्पोरेट जगत स्वत:चे वहिखाते दुरुस्त करील; परंतु गुंतवणुकीसाठी ते अजिबात धजावणार नाहीत, असा प्रहार त्यांनी केला आहे. सरकारच्या चुकीच्या भूमिके मुळे कर्जाची दरी वाढणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment