विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : विधानसभेची निवडणूक प्रक्रिया अवघ्या एक ते दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. आयोगाकडून निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या दिशानिर्देशात जिल्हा निवडणूकशाखेमार्फत निवडणूक आयोगाच्या आदेश बरहुकूम सतर्कतेने सज्जता करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील विधानसभेच्या बारा मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रियेसाठी तब्बल २८ हजार मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहे.. या निवडणुकीचा पूर्वतयारीचा भाग म्हणून मागील दोन महिन्यांपासून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक असलेली कामे पूर्ण करण्यात आली.

या निवडणुकीच्या मतदानप्रक्रियेसाठी वापरली जाणारी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे जिल्ह्यात तमिळनाडू येथून दाखल झाली आहेत. एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात या मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीत पूर्ण करण्यात आली आहे.

तसेच आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणुकीतील मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम देखील घेण्यात आला. या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमानंतर ३१ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.

या मतदारयादीनुसार जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या ३४ लाख ६९ हजार ३९२ इतकी आहे. यात महिला मतदार १६ लाख ६३ हजार ३८५ , पुरुष मतदार १८ लाख ५ हजार ८५५ आणि इतर १५६ मतदारांचा समावेश आहे.

मतदारयादीत असलेल्या या सर्व मतदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदारांच्या माहितीसाठी १९५० हा मदत क्रमांक ४ सप्टेंबरपासून कार्यान्वित करण्यात आला आहे.

दरम्यान आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया आदर्श आणि पारदर्शी पद्धतीने संपन्न होण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने प्रत्येक बाबींचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात मिळून ३ हजार ७२२ मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी, एक सहाय्यक आणि एक पोलिस मिळून प्रत्येकी सात जणांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

मतदान केंद्रांची संख्या विचारात घेता मतदान प्रक्रियेसाठी २६ हजार ५४ जणांचे मनुष्यबळ आवश्यक आहे. २५ टक्के राखीव संख्या लक्षात घेऊन निवडणूक शाखेच्या वतीने एकूण २८ हजार मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

बारा विधानसभा मतदारसंघ करता निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पदाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment