अहमदनगर- मनामध्ये उद्भावणार्या विपरित भावनांना दूर करुन शांती स्थापित करण्यासाठी परमात्म्याचा आधार घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी बोरगड, नाशिक येथील विशाल ठक्कर मैदानांवर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या तीन दिवसीय 53 व्या वार्षिक निरंकारी संत समागमामध्ये उपस्थित भक्तांच्या विशाल जनसमुदायाला संबोधित करतांना त्यांनी केले.
या संत समागमात महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपर्यातून लाखो भाविकांनी उपस्थिती लावली होती. विदेशातून ही भाविक मोठ्या संख्येने आले होते. नगरसह जिल्ह्यातील हजारो भाविक ही नुकतेच समागमाहून परतले असल्याचे मंडळाचे अहमदनगर क्षेत्राचे विभागीय प्रमुख हरिष खुबचंदानी यांनी सांगितले.
अत्यंत उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या समागमाच्या समारोपप्रसंगी सद्गुरु माताजी पुढे म्हणाल्या की, आपले मन अनेक रंग धारण करत असते कधी ते पाषणासारखे कठोर बनते तर कधी मेणासारखे मऊ बनते, कधी या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो तर कधी प्रेमाने भरुन जाते म्हूणनच मनामध्ये जेव्हा दुष्ट भावना उत्पन्न होतात. तेव्हा त्यांना मनामध्ये थारा देऊ नये.
सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले की, ईश्वराशी नाते जोडल्याने आपले जीवन संतुलीत होते, वर्तमान जीवन सुधारते आणि भविष्यही सावरले जाते. यासाठी आपण ज्ञान व कर्म या दोन्ही पैलूंकडे लक्ष द्यायला हवे. शेवटी त्यांनी सांगितले की, इतरांचे दुर्गुण न पाहता आत्मसुधाराकडे लक्ष दिले तर जीवन उज्वल बनेल. आपल्या कर्मातून, व्यवहारातून सदगुरु दिसून यायला हवा, तेव्हाच जीवनात माधुर्य येईल.
समागमात तिन्ही दिवस दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत आयोजित सत्संग कार्यक्रमात विविध वक्ते, भक्तगण अनेक भाषांच्या माध्यमातून मिशनचा सत्य, प्रेम, एकत्व, बंधूत्व, शांती, समता, मानवता, अनेकतेतून एकता, विश्वबंधूत्व यासारख्या उदात भावना जनसामान्यांपर्यंत पोहोचवित होते. प्रत्येक सत्राच्या शेवटी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजांचे मार्गदर्शनपर आध्यत्मिक प्रवचन होत. बहुभाषिक कवी संमेलन तसेच निरंकारी सेवा दल रॅली सुद्धा मोठ्या उत्साहात पार पडली व ‘निरंकारी मिशनची 90 वर्ष’ या विषयावर प्रकाशझोत टाकण्यात आला.
भव्य निरंकारी प्रदर्शनी समागमाचे मुख्य आकर्षण होती, त्यात मिशनचा इतिहास, सामाजिक कार्य, संदेश आदिंची आकर्षक अद्यावत मांडणी करण्यात आली होती. याशिवाय बाल प्रदर्शनी, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनची प्रदर्शनी, मुंबई डॉक्युमेंटरीसह कायरोप्रॅटिक चिकित्सेचे एक शिबीर समागमस्थळी लावण्यात आले होते. त्यामध्ये 13 देशातील 60 हून अधिक विदेशी डॉक्टर्सनी आपली निष्काम सेवा प्रदान केली, ज्याचा लाभ हजारो व्याधिग्रस्तांनी घेतला. ही उपचार पद्धती पाठीच्या कण्याशी निगडीत असून, कायरोप्रॅटिक चिकित्सेद्वारे हाताद्वारे उपचार करुन पाठीच्या कण्यामध्ये निर्माण झालेला दोष दूर केला जातो. यु.एस.ए., कॅनडा यासारख्या विकसनशिल देशात या चिकित्सेद्वारे उपचार केले जात आहेत, असे यातील तज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
नाशिक येथील संत समागमानंतरही सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांची ही कल्याणयात्रा अशीच पुढे चालू राहणार असून, पुणे, वाई, कोल्हापूर, पंढरपुर, औरंगाबाद आदि शहरातील कार्यक्रम करत मुंबईत पोहचणार आहेत. तेथील कार्यक्रमांनंतर गुजरातमधील काही शहरांमध्ये दर्शन देऊन दि.14 फेब्रुवारी रोजी त्या दिल्लीत परतणार आहेत, अशी माहिती हरिषजी खुबचंदानी यांना शेवटी दिली.