संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव शिवारात मधुबन पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाने मोटारसायकलला पाठिमागून जोराची धडक दिल्याने मोटारसायकलीवरील एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना रविवार दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे.
भानुदान सोपान केदार (वय-३५, रा.गाढवलोळी, अकलापूर, ता.संगमनेर) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजू शंकर दुधवडे (वय-४५) व भानुदास सोपान केदार (रा.गाढवलोळी, अकलापूर) हे दोघे जण मोटारसायकलीवरुन रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव शिवारात असणाऱ्या मधुबन पेट्रोल पंपासमोरुन जात असताना त्याच वेळी पाठिमागून येणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने, अविचाराने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात येवून पाठिमागून मोटारसायकलला जोराची धडक दिली.
त्यामुळे झालेल्या अपघातामध्ये भानुदास केदार हे गंभीररित्या जखमी झाल्याने ते ठार झाले. तर राजू दुधवडे हे गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी राजेंद्र केदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी अज्ञात वाहन चालक विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक करत आहेत.