जैश-लश्कर मुख्यालयासह 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त ! 75 दहशतवादी ठार आणि 55 जखमी

Published on -

Operation Sindoor : 7 मे 2025 रोजी पहाटे 1:30 वाजता भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील 9 दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केले. या संयुक्त कारवाईत भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलाने एकत्रितपणे 24 क्षेपणास्त्रे डागून जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या दहशतवादी तळांना उद्धवस्त केले.

ही कारवाई 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर होती, ज्यात 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकासह 26 जणांचा मृत्यू झाला होता. भारतीय गुप्तचर यंत्रणा RAW ने लक्ष्य निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. खालील ठिकाणे लक्ष्य करण्यात आली, त्यांचे अंतर आणि महत्त्व याबाबत माहिती खाली दिली आहे.

बहावलपूर: हे ठिकाण आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर आहे. येथे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते, जे या हल्ल्यात पूर्णपणे उद्धवस्त झाले. स्थानिक वृत्तांनुसार, या हल्ल्यात 30 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. बहावलपूर हे जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण आणि नियोजनाचे केंद्र होते, ज्याने 2001 च्या संसद हल्ल्यासह अनेक दहशतवादी कारवाया घडवल्या होत्या.

मुरीदके: आंतरराष्ट्रीय सीमेपासून 30 किमी अंतरावर असलेले हे ठिकाण लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय होते. 26/11 मुंबई हल्ल्याचे नियोजन याच ठिकाणाहून झाले होते. भारतीय हल्ल्यात हे तळ उद्धवस्त झाले असून, वृत्तसंस्था ANI नुसार, येथे 62 लष्कर दहशतवादी आणि त्यांचे हँडलर मारले गेले.

गुलपुर: पुंछ-राजौरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेपासून (LoC) 35 किमी अंतरावर असलेला हा दहशतवादी तळ होता. येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि घुसखोरीसाठी तयार केले जात होते. भारतीय हल्ल्यात हा तळ नष्ट झाला.

लष्कर कॅम्प सवाई: तंगधार सेक्टरमध्ये LoC पासून 30 किमी आत असलेला हा लष्कर-ए-तैयबाचा तळ होता. येथे घुसखोरीसाठी दहशतवाद्यांना तयार केले जात होते. हा तळही या हल्ल्यात उद्धवस्त झाला.

बिलाल कॅम्प: जैश-ए-मोहम्मदचा हा लॉन्चपॅड LoC पासून जवळपास 20 किमी अंतरावर होता. दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्यासाठी याचा वापर होत असे. भारतीय क्षेपणास्त्रांनी हा तळ नष्ट केला.

कोटली: LoC पासून 15 किमी अंतरावर असलेल्या या लष्कर-ए-तैयबाच्या तळावर 50 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना सामावून घेण्याची क्षमता होती. भारतीय हल्ल्यात हा तळ पूर्णपणे उद्धवस्त झाला.

बरनाला कॅम्प: LoC पासून 10 किमी अंतरावर असलेला हा दहशतवादी तळ होता. येथे दहशतवाद्यांचे प्रशिक्षण आणि हल्ल्यांचे नियोजन होत असे. हा तळही या कारवाईत नष्ट झाला.

सरजाल कॅम्प: सांबा-कठुआसमोर आंतरराष्ट्रीय सीमेपासून 8 किमी अंतरावर असलेला हा जैश-ए-मोहम्मदचा प्रशिक्षण तळ होता. भारतीय हल्ल्यात हा तळ उद्धवस्त झाला.

महमूना कॅम्प: सियालकोटजवळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किमी अंतरावर असलेला हा हिज्बुल मुजाहिदीनचा प्रशिक्षण तळ होता. या हल्ल्यात हा तळही नष्ट झाला.

सूत्रांनुसार, या हल्ल्यात 75 दहशतवादी ठार आणि 55 जखमी झाले. पाकिस्तानने या हल्ल्यांना “युद्धाची कृती” संबोधत प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे, परंतु भारताने हे हल्ले केवळ दहशतवादी तळांवरच केल्याचे ठामपणे सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe