अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- गेल्या काही महिन्यांपासून नगर महापालिका हद्दीत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र,अद्यापही शहरातील कोरोनाची साखळी तुटलेली नाही. जिल्ह्यात सर्वांधिक कोरोना बाधित महापालिकाहद्दीत आहेत.
यासाठी शहरातील पितळे जैन बोर्डींगसह जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग होस्टेलच्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविकांची महापालिकेत कमतरता आहे. त्यामुळे हे दोन्ही २३० बेडचे कोविड सेंटर रखडले आहे.

यापूर्वी महापालिकेने आरोग्य विभागात नोकर भरतीची जाहिरात प्रसिध्द केली होती. नोकर भरतीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. प्राप्त उमेदवार हजर होत असून, त्यांना नियुक्ती पत्र देण्यात येत आहे. ही प्रक्रिया लांबल्यामुळे कोविड केअर सेंटर सुरू करण्यास विलंब होत आहे.
महापालिकेने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतीगृहासह आनंद लॉन्स येथे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. याशिवाय पितळे जैन बोर्डिंगच्या इमारतीत ८० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. खाटांचीही व्यवस्था झालेली आहे.
तसेच जिल्हा रुग्णालयाने नर्सिंग होस्टेलच्या इमारतीत १५० बेडचे सेंटर पालिकेमार्फत चालविण्याचा प्रस्ताव यापूर्वीच दिला आहे. सुविधांसह हे सेंटर पालिकेला मिळालेले आहे. परंतु, महापालिकेकडे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविकांचीच कमतरता आहे.
महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी नटराजसह अन्य प्रस्तावित केविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी केली आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही अधिका-यांची बैठक घेऊन नटराज हॉटेलमधील कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या.
परंतु, कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने कोविड केअर सेंटर रखडले आहे. त्यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे. शहरातील सुरभी हॉस्पिटलमधील एका रुग्णाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. नटराज हॉटेलमधील कोविड केअर सेंटर उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
परंतु, या घटनेमुळे या हॉटेलमधील गॅलरीला लोखंडी जाळी लावून बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असून, हे काम पूर्ण झाल्यानंतरच तिथे कोविड केअर सेंटर सुरू होईल, असे सांगण्यात आले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved