बूट फेकून मारल्याच्या गुन्ह्यात नगरसेवक योगीराज गाडे आरोपी

Published on -

अहमदनगर :- रस्त्याच्या कामावरून महानगरपालिकेतील शहर अभियंत्याच्या अंगावर बूट फेकल्याच्या गुन्ह्यात आणखी सहा आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत.

शिवसेनेचे नगरसेवक योगिराज गाडे यांचा गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे. आता या गुन्ह्यात 18 आरोपी झाले आहेत.

शहर अभियंता विलास सोनटक्के यांना बूट फेकून मारल्याच्या गुन्ह्यात नगरसेवक योगीराज गाडे यांच्यासह आणखी सहा जणांचा समावेश करण्यात आला.

पोलिस कोठडीत असलेला शिवसेना कार्यकर्ता मदन आढाव याची जामिनावर सुटका झाली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. काळे यांनी २५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याचा जामीन मंजूर केला.

नगरसेवक अशोक बडे यांची रवानगी मात्र न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. बोल्हेगाव उपनगरातील रस्त्याचे काम बंद पडल्याच्या निषेधार्थ शिवसेना उपनेते अनिल राठोड, नगरसेवक अशोक बडे,

आकाश कातोरे, मदन आढाव, नगरसेविका कमल सप्रे, रिता भाकरे, दत्तात्रय सप्रे आदींनी नागरिकांसह आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या कार्यालयात ठिय्या दिला होता.

या वेळी संतप्त कार्यकर्त्यांनी सोनटक्के यांना शिवीगाळ व दमदाटी करत बूट फेकून मारला होता. याप्रकरणी सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी राठोड यांच्यासह २० जणांविरुध्द गुन्हा दाखल केला.

त्यानंतर नगरसेवक योगराज गाडे यांच्यासह आणखी सहा जणांचा गुन्ह्यात सहभाग आढळून आला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी ही नावे निष्पन्न केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe