अहमदनगर :- पुत्राच्या हट्टासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे भाजपसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटी घेत असताना दुसरीकडे पुत्रहट्टापुढे आता भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी हतबल झाले आहेत.
खासदार गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज नेल्याने राजकीय समिकरणे पुन्हा बदलली आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यानंतर विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय उमेदवारी देखील देण्यात आली. त्यामुळे गांधी समर्थक नाराज झाले होते.
गेल्या रविवारी समर्थकांच्या मेळाव्यात गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर सुवेंद्र यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात दौरे देखील सुरू केेले होते.
गेल्या पाच दिवसांपूर्वी महायुतीच्या मेळाव्यात पालकमंत्री राम शिंदे यांनी गांधींची चिंता करू नका, दोन दिवसांत पाहून घेतो, असे आश्वासन डॉ. सुजय यांना दिले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉ. सुजय यांचे वडील राधाकृष्ण विखे यांनी खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली होती.
त्यानंतर डॉ. सुजय विखे यांनीही गांधींची भेट घेतली. गांधी व विखेंचे मनोमिलन झाल्याचे सांगितले जात असताना सुवेंद्र यांनी अर्ज नेल्याने राजकीय गणिते पुन्हा बदलली आहेत. अर्ज नेल्यामुळे पुत्राच्या हट्टापुढे खासदार हतबल झाल्याचे दिसून येत आहे.