वृत्तसंस्था :- उत्तरप्रदेशातील एका शाळेत माध्यान्ह भोजन कार्यक्रमांतर्गत एक लीटर दुधात बादलीभर पाणी टाकून ते ८० मुलांना देण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेत शिक्षकमित्राला निलंबित केले असून चौकशीचे आदेश दिले आहेत. सोनभद्र जिह्यातील कोटा ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या बनवा प्राथमिक विद्यालयातील बुधवारची ही घटना आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याबाबत शाळेचे मुख्याध्यापक शैलेश यांनी सांगितले की, मंगळवारी त्यांच्या भावाचा तेरावा असल्याने ते पुरेशा दुधाची व्यवस्था करू शकले नाही. बुधवारी ते चार लीटर दूध आणण्यासाठी बाजारात गेले होते.
परंतु त्यापूर्वीच दुसऱ्या शिक्षकांनी उपलब्ध एक लीटर दुधात पाणी टाकून विद्यार्थ्यांना दिले. माध्यान्ह भोजन कार्यक्रमानुसार प्रत्येक विद्याथ्र्याला १५० मिली दूध देणे अनिवार्य आहे.
या हिशेबाने ८० विद्यार्थ्यांसाठी किमान दहा ते बारा लीटर दूध तरी आवश्यक आहे. असे असताना मुख्याध्यापक शैलेश चार लीटर दूध तरी कसे वाटणार होते, असा प्रश्न निर्माण होतो.
सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमधून हा प्रकार समोर येताच जिल्हाधिकारी एस. राजलिंगम यांनी शाळेत जाऊन सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे जबाब घेतले. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून एका शिक्षकमित्राला निलंबित करून त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.