पाथर्डी :- तालुक्याच्या राजकारणातील बुलंद तोफ आणि पक्ष व कार्यकर्त्यांसाठी संघर्षशील नाउमेद नेतृत्व म्हणून ओळख असलेले केदारेश्वरचे चेअरमन ॲड.प्रताप ढाकणे.
यांचे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी पूनर्वसन करणार का? अशी चर्चा आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह ढाकणे समर्थकांमध्ये सुरु आहे. ॲड.ढाकणे यांचा राजकीय प्रवास सुरुवातीपासूनच संघर्षमय ठरलेला आहे.

सन १९९५,९६ ला त्यांनी राजकारणात सक्रिय होत तिसगाव गटातून पहिली जि.प.ची निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी तिन वेळा विधानसभा लढवली यामध्ये २००४ व २००९ ला भाजपाकडून तर २०१४ ला राष्ट्रवादीत प्रवेश करून शेवगाव पाथर्डी मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आ.चंद्रशेखर घुले यांना मदत केली.
त्यानंतर नुकत्याच झालेल्या सन २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून स्वत: ढाकणे यांना पक्षाने उमेदवारी दिली. मात्र विद्यमान आमदार मोनिका राजळे यांनी त्यांचा पराभव केला.
ही निवडणूक ढाकणे यांच्यासाठी आशेचा किरण ठरणारी होती. तिन वेळा ढाकणे यांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी कधीही राजकारणात ॲड.ढाकणे नाउमेद वाटले नाही.
ढाकणे आणि राजकीय संघर्ष एक समीकरणच बनले. पराभवाचा अनेक वेळा सामना करतांना ढाकणे यांनी कधीही इतरांवर तोंडसुख घेतले नाही.
पक्ष कार्यकर्त्यांना त्यांनी कधी अंतर दिले नाही. दिलेला शब्द नेहमी प्रमाण मानला. त्यांचे वडील माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांनी देखील राजकारणात आगमन करतांना गावपातळीपासून होणारा संघर्ष पाहीला.
मात्र ते देखील त्या संघर्षावर यशस्वीपणे मात करत देशाच्या केंद्रीय मंत्रीमंडळापर्यंत जावून पोहचले व राजकारणातले यशस्वी शिखर गाठले. त्यामुळे प्रताप ढाकणे यांनी राजकारणात करावा लागणारा संघर्ष जवळून पाहिला आणि अनुभवला देखील.
त्यांचे चिरंजीव युवानेते ऋषीकेश ढाकणे यांनी देखील राजकारणात एन्ट्री घेतल्याने ढाकणेंची दुसरी पिढी देखील राजकारणात उतरली असली तरी ॲड.प्रताप ढाकणे यांच्या राजकीय संघर्षशील प्रवासाचा विचार नक्कीच राष्ट्रवादीचे जानतेनेतृत्व करेल व ढाकणे त्यांच्या पंखाला निश्चित बळ देईल अशी चर्चा पाथर्डी शेवगाव तालुक्यात सुरू आहे. सध्या ढाकणे पिता-पुत्र मुंबईतच असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे.