अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- महिला बचत गटाच्या माध्यमातून पर्यावरण, महिला सबलीकरण, समाजकारण, शिक्षण आधुनिकीकरण आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जयहिंद महिला मंच अध्यक्ष व नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांना छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय निसर्ग मित्र समिती
(महाराष्ट्र शासन) व ग्रामपंचायत टेंभे यांच्या वतीने कै. बापूसाहेब चिला शिवबा अहिरे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टेंभे (बागलाण, नाशिक) येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार तांबेंना प्रदान करण्यात आला.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, वरिष्ठ पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, साहित्यिक कवी सुभाष सोनवणे, अतुल निकम, सरपंच भाऊसाहेब अहिरे, विश्वासराव पगार, निर्मला गुंजाळ यावेळी उपस्थित होते. तांबे यांनी जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून वाड्यावस्त्यांवर महिला संघटन करत महिला सबलीकरणाची चळवळ राबवली.
आरोग्य शिबिरे, चर्चासत्रे, मार्गदर्शन, सहलींबरोबर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून दंडकारण्य अभियानात प्रकल्प प्रमुख म्हणून त्या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. जयहिंदच्या युवकांना प्रोत्साहन देत निरोगी व निकोप समाज निर्मितीचे काम सुरू आहे. शहरात स्वच्छ, हरित, सुंदर संगमनेरसह अनेक विकास योजना राबवल्या जात आहे.
स्वच्छतेसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहे. गोरगरीब व अपंगांसाठी विशेष योगदान त्यांनी दिले. उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रबोधनपर व्याख्याने देत महिला सबलीकरणाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.
पुरस्काराबद्दल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, कांचन थोरात, अॅड. माधवराव कानवडे, रामदास वाघ, रणजितसिंह देशमुख, सत्यजित तांबे, शिवाजीराव थोरात, प्रतापराव ओहोळ, लक्ष्मण कुटे, मीरा शेटे, सुनंदा जोर्वेकर, अमित पंडित, शंकरराव खेमनर, कुंदन लहामगे व नगरसेवकांनी अभिनंदन केले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved