राहाता :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामधेनू समजली जाणाऱ्या जिल्हा बँकेचे राहाता तालुक्यात जवळपास १२९ कोटी शेती कर्ज थकले आहे. बँकेचा वसूल अवघा सहा टक्क्यांवर आला असून, गेल्या तीन-चार वर्षातील कोरडा दुष्काळ, चालू वर्षीच्या ओल्या दुष्काळाने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. महाआघाडीच्या सरकारकडून वंचित व गरजू शेतकऱ्यांना घोषणेप्रमाणे कर्जमाफी होईल, अशी अपेक्षा बळीराजाकडून व्यक्त होत आहे.
राहाता तालुक्यात ७३ सेवा संस्थांच्या माध्यमातून जिल्हा बँक शेतकऱ्यांना शेती कर्ज तसेच शेतीपूरक कर्जाचे वाटप करते. सन २०१९-२० या वर्षात बँकेने सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून तालुक्यात वाटप केलेल्या शेती कर्जांपैकी ११ हजार ४२२ शेतकरी थकबाकीत गेले असून, त्यांच्याकडे ९३ कोटी ३४ लाख ७६ हजारांची थकबाकी आहे.
३५ कोटी ५३ लाख २८ हजारांची चालू बाकी असून, चालू वर्षात आजअखेर बँकेचा वसूल अवघा सहा टक्के असल्याची माहिती बँकेचे तालुका विकास अधिकारी गुळवे यांनी दिली. क्लिष्ट निकषांमुळे बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ झाला.
मात्र, २०१६-१७ तसेच २०१७-१८ या दोन वर्षात पडलेल्या भीषण कोरड्या दुष्काळामुळे शेतीच्या थकबाकीत मोठी वाढ झाल्याचे चित्र तयार झाले. तसेच चालूवर्षी परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात दाणादाण उडवून दिल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरिपाच्या सोयाबीन, बाजरी, मका, भुईमूग पिकांसह फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या महिन्यात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न झाले असून, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा या सरकारकडून होवून अडचणीत असलेल्या बळीराजाला दिलासा मिळेल, अशी आशा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.