राहुरी : नगर जिल्ह्यात उसाचे आगार समजल्या जाणाऱ्या राहुरी तालुक्यातील दोन साखर कारखान्यांचे धुराडे यंदा प्रथमच उसाअभावी बंद राहणार आहेत. त्यामुळे उपलब्ध उसाला बाहेरील साखर कारखान्यांचाच ‘आधार’ राहणार असल्याचे चित्र आहे.
दिवाळी संपताच ऊस हंगाम चालू होतो. तालुक्याची कामधेनू मानला जाणारा डॉ. तनपुरे कारखाना तीन वर्षे बंद झाल्यानंतर दोन वर्षे पुन्हा सुरू झाल्याने ऊस उत्पादक सभासदांना आधार मिळाला. मात्र, चालूवर्षी कारखाना बंद राहणार असल्याने ऊस उत्पादकांत संभ्रम निर्माण झाला.
गेल्यावर्षी तनपुरे कारखान्याने तीन लाख टनापर्यंत ऊस गाळप केले. सलग दोन वर्षे कारखाना सुरू करण्यास व्यवस्थापनाला अनेक कसरतींचा सामना करावा लागला.
मात्र, यंदाच्या वर्षी प्राप्त माहितीनुसार केवळ दोन ते अडीच लाख मे. टन ऊस उपलब्धता असण्याचा अंदाज आहे. कारखान्याने यापूर्वी १० लाख टनांपर्यंत उच्चांकी उसाचे गाळप केलेले आहे. मात्र, यंदा कारखान्याचे बॉयलर पेटणार नसल्याने कामगार, मजूर देखील चिंतेत आहेत.
राहुरी तालुक्यात प्रसाद शुगरने मागील वर्षी पाच लाख मे. टन उसाचे यशस्वीरित्या गाळप केले होते. प्रसाद शुगरने बाहेरून देखील ऊस गाळपाचे नियोजन केले होते.
मात्र, यावर्षी प्रसाद शुगरचे धुराडे पेटण्याची आशा धूसर बनली आहे. प्रसाद शुगरच्या व्यवस्थापन व शेतकी विभागाकडून उसाच्या उपलब्धतेची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. असे असले तरीही ऊस उपलब्धतेवरच कारखाना सुरू होईल की नाही हे ठरण्याची शक्यता आहे.