श्रीरामपूर :- तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या शिवाजी विठ्ठल शाख याला 17 वर्षे सक्तमजुरी व 60 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
आरोपी शिवाजी शाख याने 3 जून 2017 रोजी पीडित मुलीस तिच्या मामाच्या घरून आईकडे नेवून सोडतो, असे सांगून घरी न सोडता गावाजवळील निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले व दुसर्या दिवशी तिला तिच्या आईकडे सोडले.

झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगू नकोस, नाहीतर तुला मारून टाकेल, अशी धमकी दिली होती.
दरम्यान, मुलगी घाबरलेली होती, तसेच तिला तापही आला होता. त्यामुळे आईने मुलीची विचारपूस केली असता पीडित मुलीने सर्व हकीकत सांगितली. याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर खटल्याचे दोषारोपपत्र दाखल करण्यात येऊन श्रीरामपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एन. सलिम यांच्यासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे अॅड. बी.एल. तांबे व अॅड. पी.पी. गटणे यांनी महत्त्वाच्या लोकांच्या साक्षी नोंदवल्या.
त्यानंतर न्या. सलिम यांनी आरोपीस भा. दं. वि. कलम 376 अन्वये 10 वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच बालकांचे लैैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 अन्वये 7 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.