अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या रेखा जरे या पिडीत महिलांच्या मदतीला नेहमी धावून जायच्या. कोपर्डीतील निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.
मात्र आज त्यांचीच हत्या झाल्यानंतर सारे काही शांत झाल्यासारखे वाटते. या हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठेला तात्काळ अटक व्हावी अशी मागणी जरे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षारेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बोठे अद्यापही फरार आहे.
दरम्यान या हत्या कांडातील तपासाला गती मिळावी मुख्य सूत्रधाराला अटक झाली पाहिजे समाजातील अश्या प्रवृत्तीना आळा घालण्यासाठी जरे कुटुंबियांच्या पुढाकाराने ‘कँडल मार्च’ काढण्यात आला आहे.
अश्या प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना आळा बसायला हवा कारण अश्या प्रवृत्तीची माणसं वेगवेगळ्या क्षेत्रात असतात. रेखा जरे यांचा सामाजिक उपक्रमात नेहमी सहभाग असायचा त्यांना न्याय मिळेपर्यंत आपण लढत राहू असे आमदार संग्राम जगताप कँडल मार्च च्या समारोप प्रसंगी बोलतांना म्हणाले.
या कँडल मार्चच्या वेळी स्नेहालय चे गिरीश कुलकर्णी,जनाधार संघटनेचे प्रकाश पोटे, फुले ब्रिगेडचे दीपक खेडकर, मठ – मंदिर समितीचे अध्यक्ष हरिभाऊ डोळसे,
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितीन निगडे, तृतीय पंथीयांच्या संघटनेचे काजल गुरु,अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज खान, नलिनी गायकवाड, बागडे, मंगल भुजबळ आदी उपस्थित होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved