जामखेड : मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्यातील अनेक तरुणांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वेगवेगळी आंदोलने केली. लोकशाहीने त्यांना हा अधिकार दिला असून, याच चौकटीत त्यांनी ही आंदोलनं केली आहेत.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती समारंभाला तत्कालीन लोकसभा सभापती सुमित्राजी महाजन या चौंडी इथे आल्या असताना, धनगर समाज बांधवांनी त्यांना आरक्षणाबाबत निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु त्यावेळी स्थानिक प्रशासनाने त्यांना सहकार्य करण्याऐवजी पोलिसांनी लाठीमार करुन त्यांच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल केले. आधीच्या सरकारने केवळ सूड भावनेने हे गुन्हे दाखल केले असून, त्यात शिक्षण पूर्ण झालेले आणि नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांचाही समावेश आहे.
पण गुन्हे दाखल झाल्यामुळे या तरुणांचं भविष्य कायद्याच्या कचाट्यात अडकलंय. याबाबत राज्यातील वेगवेगळ्या भागातील मराठा व धनगर समाजातील तरुणांनी आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन या सामाजिक आंदोलनाचे गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार आ.पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन हे गुन्हे मागे घेण्याची विनंती केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित होते.
त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा करून कायदेशीर बाबी तपासून, मराठा व धनगर समाजातील आंदोलकांसह इतर सामाजिक संघटनांनी विविध मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनामुळे कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन गृहमंर्त्यांनी दिल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी दिली.